CT Prize Money : जय शहांनी ICC चा पेटारा उघडला, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार!
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उलटी गिनती सुरू झाली आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Champions Trophy 2025 Prize Money : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उलटी गिनती सुरू झाली आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. 8 संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठी बक्षीस रक्कम ठेवली आहे. विशेष म्हणजे गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत बक्षीस रकमेत 53% वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, गट टप्प्यातील सामने जिंकण्यासाठी संघांना वेगळे पैसे दिले जातील आणि स्पर्धेत शेवटचा क्रमांक असणारा संघ देखील रिकाम्या हाताने परतणार नाही.
विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी रुपये
8 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी परतणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 2017 मध्ये खेळवण्यात आली होती, यावेळी बक्षीस रकमेत मागील आवृत्तीच्या तुलनेत 53% वाढ करण्यात आली आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण बक्षीस रक्कम 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. यावेळी चॅम्पियन होणाऱ्या संघाला 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये दिले जातील. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला 1.12 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपये मिळतील. याशिवाय, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना बक्षीस म्हणून अंदाजे 5 कोटी रुपये दिले जातील.
विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये बाहेर पडणारे संघही रिकाम्या हाताने जाणार नाहीत. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना 3.5 लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे 3 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना 1 लाख 40 हजार डॉलर्स म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये दिले जातील. याशिवाय, गट टप्प्यातील प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये दिले जातील. दुसरीकडे, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना $125,000 म्हणजेच अंदाजे 1 कोटी रुपये वेगळे दिले जातील.