व्यवसाय

Mutual Fund : शेअर बाजारातील घसरणीचा फटका, जानेवारीत म्यूच्युअल फंड्सची AUM 1.1 लाख कोटींनी घटली, SIP च्या रकमेतही घट

Mutual Fund : शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम म्यूच्युअल फंड गुंतवणुकीवर देखील झाल्याचं पाहायला मिळतं. एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक देखील घटली आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरु होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या टॅरिफ ट्रेडच्या घोषणेनं व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली होती.डॉलरची मजबुती, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून होणारी समभागांची विक्री यामुळं भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरु होती. याचा फटका म्यूच्युअल फंडला देखील बसला आहे. म्यूच्युअल फंडद्वारे मॅनेज केल्या जाणाऱ्या असेट अंडर मॅनेजमेंटची जानेवारीतील रक्कम घटली आहे. देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण झाल्यानं बाजारात नुकसान झाल्याचं दिसून येतं.

इक्विटी म्यूच्युअल फंडमधील निव्वळ असेट अंडर मॅनेजमेंट  1.1 लाख कोटी रुपयांनी म्हणजेच 3.26 टक्क्यांनी घटलं आहे. जानेवारीतील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 29.46 लाख रुपये होती. शेअर बाजारातील घसरणीचा सर्वाधिक परिणाम स्मॉल कॅप शेअरवर झाल्याचं दिसून येते. स्मॉल कॅप फंडमधील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 23665 कोटी रुपयांनी घसरली म्हणजेच एकूण 7.19 टक्के घसरण झाल्याचं पाहायला मिळतं. 31 जानेवारीला स्मॉल कॅप फंडमधील एयूएमची रक्कम 3.05 लाख कोटी रुपये होती. 31 डिसेंबर 2024 ला हीच रक्कम 3.29 लाख कोटी रुपये होती.

मिड कॅप फंडच्या असेट अंडर मॅनेजमेंटच्या रकमेत घट झाली असल्याचं दिसून येतं. मिड कॅप फंडमधील एयूएम रक्कम 26600 कोटी रुपयांनी घटली. मिड कॅप फंडमधील 31 डिसेंबरची रक्कम 3.99 लाख कोटी रुपये होती, ती 31 जानेवारीला 3.73 लाख कोटींवर आली. ही आकडेवारी असोसिएशन ऑफ म्यूच्युअल फंडस ऑफ इंडियाकडून देण्यात आलेली आहे.

जानेवारी महिन्यात बीएसई आणि एनएसईमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. बीएसई 1.28 आणि एनएसई 0.98  टक्क्यांनी घसरण झाली होती. बीएसई स्मॉल कॅप 10.38 टक्के, बीएई मिड कॅप 7.66 आणि निफ्टी नेक्श्ट  50 मध्ये 7.5 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

इक्विटी म्यूच्युअल फंडमध्ये दरमहा होणाऱ्या गुंतवणुकीचं चित्र सकारात्मक असली तरी त्यामध्ये घसरण झाली आहे. जानेवारीत म्यूच्युअल फंडमध्ये 39687.78 कोटी रुपये गुंतवले गेले. तर, डिसेंबरमध्ये ती रक्कम 41155.91 कोटी रुपये होती. म्हणजेच 3.56 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

एसआयपीद्वारे म्यूच्युअल फंडमध्ये होणारी गुंतवणूक 59 कोटी रुपयांनी घटली आहे. जानेवारी महिन्यात एसआयपीद्वारे झालेली गुंतवणूक 26400 कोटी रुपये इतकी आहे. डिसेंबरमध्ये ही रक्कम 26459 कोटी रुपये होती.

स्मॉल कॅप फंडमधील जानेवारीतील इनफ्लो 5720.87 कोटी रुपये होता, डिसेंबरमध्ये हीच रक्कम 4667.7 कोटी रुपये होती. जानेवारीत मिड कॅप फंडमधील गुंतवणूक 5147.87 कोटी रुपये झाली, जी डिसेंबरमध्ये 5093.22 कोटी रुपये होती. तर, लार्ज कॅपमधील डिसेंबरचा इनफ्लो 2010.98  होता तो जानेवारीत 3063.33 कोटी रुपये झाला.

इतर बातम्या : 

नवं प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता, विधेयकात किती विभाग? नेमकं काय बदलणार?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button